मी आणि नितीन सर ठरल्याप्रमाणे पहाटे 6वाजताच सोलापूर मधून आमची गाडी घेऊन पंढरपूर मार्गे निघालो...
सगळीकडे पाऊस पडला होता त्यामुळे रोडच्या कडेला सगळं हिरवी शाल पांघरलेली जमीन नेहमीपेक्षा अधिक सूंदर दिसत होती, थंड हवा अंगाला स्पर्श करून जात होता, सुर्यची किरणे अजून तितकी प्रखर नसल्याने प्रवास आल्हाददायक वाटत होतं.. वाटेत क्षणभर थांबून घेतलेला चहाचा घोट त्या प्रवासाला गोडवा निर्माण करत होती.
गाव आणि गाव संस्कृती नष्ट होत आहे असं खूप ठिकाणी ऐकलं असताना, आम्हाला बहुतांश गावाच्या वेशीत प्रवेश करण्यागोदरच वेशीला लागूनच असलेला जी.प प्राथमिक शाळेतील शिक्षिकेचा आवाज आणि त्याच सोबतीला त्यांच्या सुरात सूर मिसळून खड्या आवाजात गाणारी चिमुकल्या मुलांचा आवाज गावच्या समृद्धीची साक्ष देताना दिसत होती. तर काहि गावात प्रवेश करताच पारावर बसलेली वृद्ध आमच्या कडे पाहत काही कुजबुजत होती, आम्ही ही आधी त्याच लोकांच्या जवळ जाऊन नमस्कार करणार त्यांचंही राम-राम आमच्यासाठी इनर्जी होती. स्वतःबद्दल थोढीशी माहिती सांगताना त्यांच्या नजरा उंचावत होत्या, पत्ते खेळण्यात दंग असणारी मंडळी आमच्या कडे कान टवकारून आमची माहिती ऐकत होती.गावातील स्त्रिया, लहानमुलं कुतूहलाने पाहताना दिसत होती.
पहिलं गाव "येवती" गावाच्या सुरुवातीलाच भव्यदिव्य असा प्रवेश द्वार आमच्या स्वागतासाठी सज्ज होता, लोकांच्या तोंडून कळलेलं माहिती नुसार ब्रिटिश्यांच्या काळात स्थलांतर झालेलं हे गाव ऐतिहासिक पाऊलखुणा अजूनही जपताना दिसत होतं. गावाच्या बाहेरील राणी व्हीकटोरिया च्या काळात बांधलेले घर सुद्धा तितकंच ऐतिहासिक होतं..
त्यानंतर पुढे गाडी "रोपळे बुद्रुक" या गावी येऊन थांबली तिथलीही जुनी विहिरी कशी जपली ही तिथल्या वृद्धांकडून आम्हाला कळालं.त्यानंतर "बाभूळगावातील" आमची गाडी पुढे सरकायला थोडस वेळ गेलं कारण गावातील जुनी बारव तिंथ क्षणभर थांबून आपल्या कॅमेरात कैद करण्यासरखाच होता, ही अशी भलीमोठी बारव पाहून आम्ही थक्क झालो होतो , सोबतीला गावकर्यांकडून मिळालेला पाहुणचार "हीच ती माणूसपण जपणारी माणसं" म्हणून दाद देण्या योग्यच ठरली.
पुढे आढीव गावात भेटलेला हिंदवी परिवारातील मित्रानं प्रवासातील त्रास कमी करून गेला,पुढे पुढे जाताना खेड्यापाड्यातील वाट जराशी बिकटच होती, त्यात पावसाने चिखल झालं असताना वाटेत दिसणाऱ्या विहिरी भलीमोठी झाडे, शेतात काम करणारी कष्टकरी मंडळी,बहरून आलेली शेत पाहताना मन प्रसन्न होई, क्षणभर थांबून आम्ही एकमेकांचे फोटो त्याठिकाणी काढत असू.
वाटेत भटांच्या निवासस्थानामुळे ओळखली जाणारी "भटुंबरे" गाव,त्यानंतर लागलेलं "गुरसाळे" गाव, "आजोती" पुढे जाऊन लागणारी "होले" गाव, "खेडभोसे "गाव, "देवढे" गाव, "पटवर्धन कुरोली" आणि "पिराची कुरोली" ही नदीकाठची गावे ऐतिहासिक पाऊलखुणा जपत, आपली गाव संस्कृती जपत अजूनही उभी आहेत ते पाहताना विलक्षण आनंद होतो.
प्रत्येक गावात असं काही अनुभव मिळत असतात, आम्हाला त्यांच्याकडून गावातील ऐतिहासिक वास्तू,वाडे, मंदिर, जरासं जून, जरासं वेगळं ऐकण्यात अधिक आनंद वाटतं असे. गाव पाहत, गावाची वेस ओलांडताना गावातल्या वयोवृद्ध माणसानी "कुठल्या गावचं पाव्हन..?" विचारल्यावर आपुकली पणाची जाणिव त्यांच्या डोळ्यात दिसत होती.. क्षणभर थांबून त्यांच्याशी संवाद साधून पुढच्या गावची वाट आम्ही धरलो.
हे सगळं नजरेत साठवत मोबाईल मध्ये कैद करत असताना संध्याकाळ कशी झाली कळलेच नव्हते पुन्हा परत फिरून आम्ही पंढरपूर च्या दिशेने निघालो. पंढरपूर च्या भक्तिमय वातावरणात सगळीकडे लाईटच्या लक्ख प्रकाशाने उजळलेली पंढरी न्याहाळत आम्ही पंढरपूर मध्ये आलो.. गजानन महाराजांच्या यात्री निवासात सप्ताह चालू असल्याने आम्हाला रूम मिळण्याची अडचण झाली तरी काही प्रयत्नांती एक धर्मशाळा उपलब्ध झाली..
पंढरपूर मध्ये राहुल सर आणि पहिल्याच भेटीत आपलासा झालेला मित्र योगेश ह्यांनी जेवणाचा बेत आखला होता, जेवणानंतर रात्री 10 च्या सुमारास आम्ही विठ्ठलाच्या दर्शनासाठी थांबलो अगदी 10 मिनिटात आम्हला विठ्ठलाचे चरण स्पर्श करायला मिळाल्याने आम्ही दर्शन घेऊन धन्य झालो..
रात्री उशिरापर्यंत गप्पामारण्यात धुंद आम्हाला झोप कधी लागली कळलीच नाही.
सकाळी 7 वाजता मी, राहुल सर, आणि नितीन सरां सोबत शिवाजी चौकात चहाच्या घोट घेत राहुल सरांची निरोप घेतला.
तिथून पुढे गाडी "वाखरी" गावातून पुढे "कोर्टी" गावात येऊन थांबली, गावातील प्रसिद्ध हेमाडपंथी महादेवाच मंदिर खूपच प्रशस्थ होत मंदिर ही नदीच्या काठावर असल्याने आजूबाजूच्या परिसराला अधिकच शोभा येत होती. गावातील जुन्या पडक्या मंदिरांची अवस्था अधिकच दयनीय होती, गावकऱ्यांना त्याच्या निगराणीची विनंती करून आम्ही तिथून निघालो. पुढे "गोंडेगाव", "उपरी", "भडशिंगे"," दसुर" गावातील भव्यदिव्य स्वामी समर्थांच दर्शन घेऊन आम्ही पुढे "तोंडले", "बॉंडले" "मलखांबी", "बोरगाव" श्रीपुर" करत येऊन पोचलो ते शेवटच्या गावी ते म्हणजे "म्हाळुंग" या गावी.
म्हाळुंग गावाची यमाई देवी आजूबाजूच्या गावात अगदी प्रसिद्ध होती, यमाई देवीचं मंदिर अत्यंत प्रशस्थ पणे 12व्या शतकात बांधले गेले असणार आहे, मंदिरासमोर असलेल्या विहिरीकडे पाहताना त्या वरील नजरा हटत नव्हते, मंदिर परिसरात भरपुर माकड जी इथून तिथून उद्या मारण्यात दंग होती. पुन्हा पुन्हा यावं अस हे ठिकाण नजरेत भरून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो, तिथून सोलापूर 113 किलोमीटर आहे असं कळालं, डोक्यावर ढग दाटून आले होते, परत जाण्याची चिंता सुद्धा तितकीच दाटली होती.
तरीही आम्ही निघालो तरी ह्या परतीच्या पावसाने आमची अडवणूक करण्याचा प्रयत्न केला तरीही आम्ही भिजत भिजत सोलापूर गाठली.
हा दोन दिवसांचा प्रवास अविस्मरणीय राहिला, सोबत इतिहास अभ्यासक नितीन सरांसारख्या मित्राची साथ, प्रवासाच्या वाटेवर राहुल सर आज योगेश दादाची क्षणभर सोबत हि हा प्रवास निरंतर चालु ठेवणारी इनर्जी फुल्ल व्यक्तिमत्त्व.... आयुष्यच्या सोबतीला चिरकाल राहो....
_____________________बसव




Comments
Post a Comment